1. {#1दावीद शौलापुढून पळून जातो } [PS]दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”
2. तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.
3. तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.”
4. तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.”
5. दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.”
6. मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.
7. त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक पुरुष तेथे परमेश्वराच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.
8. दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ भाला किंवा तलवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.”
9. तेव्हा याजक म्हणाला, “गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तलवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.”
10. त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
11. तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”
12. दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
13. मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
14. तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे?
15. माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?” [PE]