1. {यहोआहाजाची कारकीर्द} [PS] अहज्याचा मुलगा योवाश यहूदाचा राजा, याच्या तेविसाव्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने सतरा वर्षे राज्य केले.
2. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली, त्याने ती सोडली नाही.
3. तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
4. तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली, तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
5. मग परमेश्वराने इस्राएलाला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
6. तरीही यराबामाच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांस करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
7. अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांस त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलफटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.
8. “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
9. पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला. [PS]
10. {इस्त्राएलाचा राजा यहोआश ह्याची कारकीर्द} [PS] यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
11. परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
12. इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
13. योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले. [PS]
14. {अलीशाचा अखेरचा संदेश व मृत्यू} [PS] आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
15. तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले
16. मग अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
17. अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
18. अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
19. देवाचा मनुष्य योवाशावर रागावला. तो त्यास म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
20. अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
21. काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
22. यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
23. पण परमेश्वरासच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वरास इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्यास त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
24. अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.
25. मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशाचे वडिल यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशाने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशाने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली. [PE]