1. {सात जणांची निवड} [PS] त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
2. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
3. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.
4. म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
5. ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
6. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. [PE][PS]
7. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली. [PE][PS]
8. स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.
9. तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
10. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
11. तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”
12. आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले.
13. आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, ते म्हणाले, “हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूद्ध दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
14. कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
15. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. [PE]