1. {#1एस्तेर राजाला व हामानाला मेजवानीचे आमंत्रण देते } [PS]तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
2. त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला. [PE]
3. [PS]मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
4. एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.” [PE]
5. [PS]तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
6. ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.” [PE]
7. [PS]एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
8. जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.” [PE]
9. [PS]हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.
10. तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
11. आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला. [PE]
12. [PS]हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
13. पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.” [PE]
14. [PS]मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला. [PE]