1. {#1सोरेच्या राजाविषयी भविष्य } [PS]नंतर परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2. “मानवाच्या मुला, सोरेच्या राज्यकर्त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुझे हृदय गर्विष्ठ आहे. तू म्हणाला मी देव आहे. मी समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे. जरी तू मानव आहेस व देव नाही, तरी तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे करतो.
3. तू स्वत:ला दानीएलापेक्षा बुद्धिमान समजतोस आणि कोणतेही रहस्य तुला आश्चर्यचकित करीत नाही.
4. तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:ला संपन्न केले आहेस आणि तुझ्या खजिन्यात तू चांदी सोने संपादन केले आहेस.
5. तुझ्या मोठ्या शहाणपणाने आणि व्यापाराने तू तुझी संपत्ती वाढवली, म्हणून तुझे हृदय संपत्तीमुळे गर्विष्ठ झाले आहे.
6. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, कारण तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे केले आहे,
7. मी परक्यांना तुझ्याविरूद्ध आणीन, दुसऱ्या राष्ट्रांतून भयंकर माणसे आणीन. आणि ते तुझ्या शहाणपणाच्या सुंदरतेवर आपल्या तलवारी उपसतील आणि ते तुझे वैभव भ्रष्ट करतील.
8. ते तुला खाचेत पाठवतील आणि तू समुद्राच्या हृदयामध्ये मरण पावलेल्या वधलेल्यांच्या मरणाने मरशील.
9. तू आपल्या वधणाऱ्यासमोर, मी देव आहे. असे खचित म्हणशील काय? ज्या कोणी तुला भोसकले त्यांच्या हाती तू आहेस तो तू देव नव्हे व मानव आहेस.
10. परक्यांच्या हातून बेसुंतीच्या मरणाने मरशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.” [PE]
11. {#1सोरेच्या राजासाठी विलाप } [PS]परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले व म्हणाले,
12. “मानवाच्या मुला, सोरेच्या राजाविषयी ओरडून विलाप कर आणि त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू परीपूर्णतेची प्रतीकृतीच आहेस, तू ज्ञानपूर्ण आणि सुंदरतेत परिपूर्ण आहेस.
13. देवाची बाग एदेनमध्ये तू होतास. प्रत्येक मौल्यवान खड्यांनी तू आच्छादलेला होतास. अलाक, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, सोने अशी सर्व प्रकारची जवाहीर तुझ्या अंगभर होती, तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला घालण्यासाठी ते तयार केले होते.
14. मी तुला देवाच्या पर्वतावर एक अभिषिक्त करुब म्हणून मानवजातीच्या रक्षणासाठी ठेवले. तू अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या पाषाणांतून इकडेतिकडे चालत होतास.
15. मी तुला निर्मिले, त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडेपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास.
16. तुझा व्यापार खूप मोठा असल्यामुळे तू बलात्काराने भरला आहे, तू पाप केले आहे म्हणून मी तुला भ्रष्ट समजून देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले आणि हे पाखर घालणाऱ्या करुबा, मी तुला अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या पाषाणातून, काढून मी तुला नष्ट केले आहे.
17. तुझ्या सौंदर्यांने तुझे हृदय गर्विष्ठ बनले. तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाचा नाश करून घेतला आहे. मी तुला खाली जमिनीवर फेकले आहे. राजांनी तुझे जाहीर प्रदर्शन पाहावे यासाठी मी तुला त्यांच्यापुढे ठेवले.
18. तुझ्या खूप पापांमुळे आणि व्यापारातील अप्रामाणिकपणामुळे, तू आपले पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यामधून अग्नी काढला आहे, त्याने तुला खाऊन टाकले आहे. जे कोणी पाहतात त्या सर्वांच्यादेखत मी पृथ्वीवर तुझी राख केली आहे.
19. लोकांमध्ये जे तुला ओळखतात ते सर्व तुझ्याविषयी विस्मित होतील, तू भय असा होशील व पुन्हा कधी असणार नाहीस.” [PE]
20. {#1सीदोनेविषयी भविष्य } [PS]मग मजकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
21. “मानवाच्या मुला, सीदोनेविरूद्ध आपले तोंड कर व तिच्याविरूद्ध भविष्य सांग.
22. सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! हे सीदोने, मी तुझ्याविरूद्ध आहे. कारण मी तुझ्यामध्ये गौरविला जाईन म्हणून मी तिला न्यायाने शिक्षा करीन व तिच्यात मला पवित्र मानले म्हणजे, त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
23. मी तिच्यात मरी पाठवीन आणि तिच्या रस्त्यात रक्त पाठवीन आणि तलवार तुमच्याविरुध्द सर्व बाजूंनी येईल तेव्हा घायाळ झालेले तुम्हामध्ये पडतील मग त्यांना समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.
24. नंतर इस्राएलाच्या घराण्याच्या सभोवतालचे जे सर्व तिला तुच्छ मानत असत त्यांच्यातून कोणीही त्यांना बोचणारी काटेरी झुडुपे किंवा वेदनादायक काटे असे उरणार नाहीत, म्हणून त्यांना समजून येईल की, मीच प्रभू परमेश्वर आहे.
25. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत विखुरविले आहे, त्यांतून मी त्यास एकत्र आणीन आणि मग मी त्या विधर्मी राष्ट्रांच्या देखत त्याच्याठायी पवित्र ठरेन; मग मी जो देश आपला सेवक याकोब याला दिला त्यामध्ये ते राहतील.
26. मग ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील आणि ते घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग ते निर्भयपणे राहतील. म्हणून त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.” [PE]