1. मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.
2. नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा.
3. त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे.
4. ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा.
5. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या.
6. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे.
7. तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल.
8. त्याला मी याच कारणाने पाठवीत आहे की, आमच्याविषयीची बातमी तुम्हांला कळावी आणि तुमची अंत:करणे उत्तेजित व्हावीत.
9. मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवीत आहे, ते तुम्हांला येथे काय घडत आहे ते सांगतील.
10. अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो, त्याचप्रमाणे बर्णबाचा चुलत भाऊ मार्क ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा.
11. येशू ज्याला युस्त म्हणतात तोसुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहूदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत.
12. एपफ्राससुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्क वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे.
13. जे लवादिकीयात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. याचा मी साक्षी आहे.
14. प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात.
15. लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा.
16. आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखविले जाईल, तेव्हा ते लावदकीयाच्या मंडळीतसुद्धा वाचले जाते की नाही ते पाहा आणि तू सुध्दा माझे पत्र वाच.
17. आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.”
18. मी, पौल, हा सलाम माझ्या स्वत:च्या हस्तक्षरात लिहितो. मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.