1. स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
2. परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
3. त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
4. तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
5. सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले.
6. अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराथ केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.
7. कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले.
8. आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
9. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावुत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
10. इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
11. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईल.
12. पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
13. तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
14. आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता.
15. त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती.
16. यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
17. हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले.
18. 1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.
19. फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्रही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती)
20. या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.
21. दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
22. तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?”तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.
23. देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
24. दावीदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला
25. अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.
26. नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
27. त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता.
28. यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
29. एवदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.
30. अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
31. मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
32. आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.
33. शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
34. तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले.
35. पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
36. शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.
37. बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
38. “माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
39. शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”‘
40. शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
41. शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत.
42. (42-43) यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.
43.