1. त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळया जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच.
2. तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षीच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता.या सभेला स्त्रिया-पुरुष आणि ज्यांना ज्यांना वाचलेले समजत होते असे सर्वजण होते.
3. एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चोकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.
4. एज्रा एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
5. आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले.
6. एज्राने परमेश्वराची, थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन! आमेन!” असा उद्गार काढला. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वराला वंदन केले.
7. बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवींची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,
8. या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांना समजेल असा उलगडून सांगितला. ज्याचे पठण चालले होते ते लोकांना समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
9. यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांना स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा आजचा हा खास पवित्र दिवस आहे. आज दु:खी राहू नका आणि शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते म्हणून त्यांनी हे सांगितले.
10. नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका. कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे.”
11. लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांना शांत केले. लेवी म्हणाले, “शांत व्हा, उगे राहा. आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.”
12. मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची जी वचने शिक्षक त्यांना समजावून सांगत होते ती त्यांना अखेर समजली.
13. यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्राला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते शास्त्री एज्रा भोवती जमले.
14. (14-15) परमेश्वराने मोशेमार्फत लोकांना हे नियमशास्त्र दिले. त्यात यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी तात्पुरत्या राहूट्यांत राहावे. लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरुशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांची तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
15.
16. तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी तशा फांद्या आणल्या. त्यांतून त्यांनी स्वत:साठी तात्पुरते मांडव बनवले. प्रत्येकाने आपापल्या धाब्यावर आणि आपापल्या अंगणात मांडव उभारले. मंदिराच्या अंगणात, पाणी वेशी समोरच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले.
17. बंदिवासातून परत आलेल्या सर्वच्या सर्व इस्राएल लोकांनी असे मांडव घातले. त्यात ते राहिले. नूनचा मुलगा यहोशवा याच्या काळापासून ते आजतागायत इस्राएलींनी हा मंडपाचा सण अशाप्रकारे साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
18. या सणाच्या काळात एज्राने त्यांना रोज नियमशास्त्र वाचून दाखवले. सणाच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत एज्राने हे पठण केले. इस्राएलींनी सात दिवस हा सण साजरा केला. नियमशास्त्राला अनुसरुन आठव्या दिवशी ते सर्वजण खास सभेसाठी एकत्र जमले.