1. परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत.
2. ही मुले मिसरकडे मदत मागायला जात आहेत. पण ते जे करीत आहेत, ते योग्य आहे का; असे मला विचारावे, असे त्यांना वाटत नाही. फारो त्यांचा बचाव करील असे त्यांना वाटते. मिसरने त्यांचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे.
3. “पण मी सांगतो की मिसरमध्ये लपण्याने तुमचा काही फायदा होणार नाही. मिसर तुमचे रक्षण करू शकणार नाही.
4. तुमचे नेते सोअनला आणि तुमचे राजदूत हानेसला गेले आहेत.
5. पण त्यांची निराशा होईल. त्यांना मदत करू न शकणाऱ्या देशावर ते विसंबले आहेत. मिसर काहीच उपयोगाचा नाही. मिसर काही मदत करणार नाही. उलट तो तुम्हाला लज्जित व ओशाळवाणे करील.”
6. नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.
7. मिसरला काही अर्थ नाही. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला ‘स्वस्थ बसणारा रहाब’ असे म्हणतो.
8. आता तू हे पाटीवर लिही म्हणजे सर्व लोकांना ते दिसेल आणि हे तू पुस्तकातही लिही म्हणजे भविष्यात दूर असलेल्या शेवटच्या दिवसांसाठी ते उपयोगी पडेल.
9. पालकांचे न ऐकणाऱ्या मुलांसारखे हे लोक आहेत. ते खोटे बोलतात आणि परमेश्वराच्या शिकवणुकीकडे लक्ष देण्यास नकार देतात.
10. ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा.
11. खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.”
12. इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
13. लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील.
14. तुमची स्थिती मातीच्या बरणीप्रमाणे होईल. ही बरणी फुटल्यास तिचा चक्काचूर होतो. हे बारीक तुकडे काही उपयोगाचे नसतात. ह्या तुकड्यांनी तुम्ही विस्तवातले निखारे काढू शकत नाही. किंवा डोहातले पाणी काढू शकत नाही.”
15. परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”पण तुम्हाला हेच नको आहे.
16. तुम्ही म्हणता, “नाही! आम्हाला पळून जायला घोडे हवेत.” ते खरेच आहे. तुम्हाला घोड्यांवरून पळून जावे लागेल. पण शत्रू तुमचा पाठलाग करील. शत्रूचा वेग तुमच्यापेक्षा जास्त असेल.
17. शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. व ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.
18. तुमच्यावर दया करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर वाट पाहत आहे. परमेश्वराला प्रकट होऊन तुमचे सांत्वन करायचे आहे. परमेश्वर देव न्यायी आहे. त्याच्या मदतीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आशीर्वाद देईल.
19. यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.
20. माझ्या प्रभूने, देवाने, पूर्वी तुम्हाला दु:ख व यातना दिल्या. त्या रोजच्या भाकरीसारख्या व पाण्यासारख्याच होत्या. देव तुमचा शिक्षक आहे आता यापुढे तो तुमच्यापासून लपून शहाणार नाही. तुम्ही त्याला तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाल.
21. नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
22. तुमच्या मूर्ती सोन्या-चांदीने मढविलेल्या आहेत. ह्या खोट्या देवांनी तुम्हाला पापांच्या घाणीत लोटले आहे. पण तुम्ही त्यांची पूजा करण्याचे सोडून द्याल. तुम्ही त्या देवांना कचऱ्याप्रमाणे वा विटाळाच्या कपड्यांप्रमाणे फेकून द्याल.
23. त्या वेळेला परमेश्वर पाऊस पाडील. तुम्ही बी पेराल आणि भूमी तुम्हाला अन्न देईल. त्या वेळी पीक मुबलक येईल. तुमच्या गुरांना भरपूर चारा मिळेल. मेंढ्यांना चरायला खूप मोठे रान मिळेल.
24. तुमच्या गुरांना आणि गाढवांना भरपूर आंबोण मिळेल. सगळीकडे अन्नधान्याचा सुकाळ होईल. गुरांपुढे आंबोण पसरण्यासाठी तुम्हाला कुदळफावड्याचा उपयोग करावा लागेल.
25. प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून पाण्याचे झरे वाहतील. पुष्कळ लोक मारले गेल्यावर आणि बुरूज ढासळल्यावर हे सर्व घडून येईल.
26. त्या वेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश आतापेक्षा सातपट प्रखर होईल. एकादिवसाचा सूर्यप्रकाशआठवड्यातील सूर्यप्रकांशाइतका असेल. परमेश्वर जेव्हा त्याच्या जखमी लोकांना मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
27. पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
28. परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर ‘नाशाच्या चाळणीतून’ राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.
29. त्या वेळेला तुम्ही आनंदगीते गाल. सुटीच्या दिवसातील रात्रीप्रमाणे हा काळ असेल. परमेश्वराच्या डोंगरावर जाताना तुम्हाला आनंद वाटतो, इस्राएलच्या खडकाकडे जाताना (परमेश्वराच्या उपासनेला जाताना) बासरीचा स्वर ऐकून तुम्हाला हर्ष होतो, तसाच हा आनंद असेल.
30. परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.
31. परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर घाबरून जाईल. परमेश्वर दंडाने अश्शूरला मारील.
32. डफावर व सारंगीवर संगीत वाजवावे तसे परमेश्वर अश्शूरला मारील. आपल्या हाताने शक्तीने परमेश्वर अश्शूरचा पराभव करील.
33. पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.