1. पशहूर नावाचा एक याजक होता. परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. तो इम्मेरचा मुलगा होता. यिर्मयाने मंदिराच्या प्रांगणात केलेल्या भविष्यकथनात, ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्या पशहूरने ऐकल्या.
2. म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले. मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वाराजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले.
3. दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर ‘प्रत्येक बाजूला भय’ असे आहे.
4. हेच तुझे नाव कारण परमेश्वर म्हणतो, ‘मी तुलाच तुझे भय करीन तुझ्या सर्व मित्रांना तू भीतिदायक होशील. तुझ्या मित्रांना शत्रू तलवारीने मारताना पाहशील. मी यहूदातील सर्व माणसांना बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करीन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्याचे सैन्य त्यांना तलवारीने कापून काढील.
5. यरुशलेमच्या लोकांनी खूप कष्ट करुन वस्तू गोळा केल्या आणि ते श्रीमंत झाले. पण मी त्यांच्या सर्व गोष्टी शत्रूला देईन. यरुशलेमच्या राजाकडे पुष्कळ संपत्ती आहे. पण ती सर्व संपत्ती मी शत्रूला देईन. शत्रू ती सर्व संपत्ती बाबेल देशात नेईल.
6. पशहूर, तुला आणि तुझ्या घरातील सर्व लोकांना घरातून नेले जाईल. तुम्हाला जबरदस्तीने नेले जाईल. तुम्हाला बाबेल देशात राहावे लागेल. तू तेथेच मरशील आणि त्या परक्या देशातच तुला पुरतील. तू तुझ्या प्रवचनात खोट्या गोष्टी सांगितल्यास. ह्या गोष्टी घडणार नाहीत. असे खोटे सांगितलेस. तुझे सर्व मित्रही बाबेलमध्येच मरतील आणि त्यांना तिथेच पुरले जाईल.”
7. परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालोतू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास मी हास्यास्पद ठरलो. लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात.
8. प्रत्येक वेळी मी बोलतो, ओरडतो मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. मी मला परमेश्राकडून आलेला संदेश लोकांना सांगतो. पण लोक माझा फक्त अपमान करतात आणि माझी चेष्टा करतात.
9. कधी कधी मी स्वत:शीच म्हणतो, “मी परमेश्वराला विसरुन जाईन. मी परमेश्वराच्यायावतीने ह्यापुढे बोलणार नाही.” पण मी असे म्हणताच परमेश्वराचा संदेश माझ्या मनात अग्नीप्रमाणे दाह निर्माण करतो. त्या वेळी, माझ्या हाडांच्या आत आत काही जळत आहे, असे मला वाटते. मी परमेश्वराचा संदेश माझ्या मनात फार वेळ दाबून ठेवू शकत नाही आणि शेवटी तो मनात ठेवणे मला अशक्य होते.
10. लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकतो. सगळीकडून ज्या गोष्टी मी ऐकतो, त्याने मी घाबरतो इतकेच नाही, तर माझे मित्रही माझ्याविरुद्ध बोलतात. मी काहीतरी चूक करावी म्हणून लोक वाट पाहात आहेत. ते म्हणत आहेत, “आपण खोटे बोलू या आणि त्याने वाईट कृत्य केल्याचे सांगू या. यिर्मयाला फसविणे कदाचित् शक्य आहे. मग तो आपल्या हातात सापडेल व आपली त्याच्यापासून सुटका होईल. मग आपण त्याला पकडू आणि सूड घेऊ.”
11. पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील. ते माझा पराभव करु शकणार नाहीत. ते पडतील, त्यांची निराश होईल. त्यांची नामुष्की होईल आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.
12. सर्व शक्तिमान परमेश्वरा तू चांगल्या लोकांची परीक्षा घेतोस. तू माणसाच्या मनात खोलवर पाहतोस. मी त्या लोकांविरुद्धचे माझे मुद्दे तुला सांगितले. मग आता तू त्यांना योग्य शिक्षा करताना मला पाहायला मिळू देत.
13. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो. तो दुष्टापासून त्यांना वाचवितो.
14. माझ्या जन्मदिवसाला शाप द्या. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्माला आलो, त्या दिवसाला शुभ मानू नका.
15. माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलाना देणाऱ्या माणसाला शाप द्या. “तुम्हाला मुलगा झाला” असे त्याने सांगताच माझ्या वडिलांना खूप आनंद झाला.
16. परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला,तसाच त्या माणसांचाही होवो. परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही. त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
17. का? कारण त्या माणसाने, मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही. त्याने मला मारले असते, तर आईच माझी कबर झाली असती व माझा जन्मच झाला नसता.
18. मी कशाला जन्मलो? मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि माझे जीवन नामुष्कीत संपणार.