1. प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून,
2. देवाच्या संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती,
3. ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.
4. पण पवित्रतेच्या आत्माच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.
5. त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापाल नामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा.
6. तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.
7. ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
8. सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे.
9. देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो.
10. माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे.
11. मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे.
12. म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.
13. बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मल यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.
14. मी सर्व लोकांची - ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख- सेवा केली पाहिजे.
15. त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
16. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहूद्याकारिता आणि नंतर ग्रीकांसाठी.
17. कारण सुवार्तेमध्ये देवाचे नितिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नितिमान विश्वासाद्वारे वाचेल.’
18. लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.
19. हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.
20. जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.
21. कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.
22. जरी गर्वाने त्यांनी स्वत:ला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले.
23. आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.
24. यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली.
25. त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.
26. तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले.
27. तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले.
28. आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली.
29. ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात.
30. ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच
31. मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत.
32. देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.